chandan-vandan

चंदन - वंदन

( Twin Brothers in Satara)

चंदन वरून दिसनारा वंदन

वंदन वरचे अवशेष

वंदन चा " रॉक"

गडाखालचे मन्दिर

चंदन वंदन

किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग

जिल्हा: सातारा, जवळचे ठिकाण : भुईंज

उंची: चंदन (३८३६ फूट)- वंदन (३८४१ फूट)

लोहगड-विसापूर आणी पुरंदर-वज्रगड या जोडकिल्ल्यांप्रमाणेंच सातारा जिल्ह्यांतील चंदन - वंदन ही किल्ल्यांची जोडीही इतिहासात प्रसिद्ध आहे. शिलाहार राजा दुसरा भोज याने निर्माण केलेल्या किल्ल्यांच्या संचात या जोडगोळीचा अंतर्भाव होतो.

इतिहास:-

निर्मीती ११९१ साली. सन् १३३७-३८ दरम्यान बहामनी सुलतान अल्लाद्दीन याने सातारा प्रांत ताब्यात घेतला. बहामनी सत्तेच्या अस्तावेळी हे गड आदिलशाही अंमलाखाली आले. १६७३ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि चंदन-वंदनला स्वराज्यात सामील केले. २५ ऑगस्ट १७०१ रोजी मोगलांनी चंदन जिंकला आणि ७ ऑक्टोबर १७०१ ला वंदन. १७०७ मध्ये शाहुमहाराजांनी हे गड जिंकून घेतले. १८१८ मध्ये इंग्रजांनी तोफांचा भडीमार करुन ही जोडगोळी जिंकली.

या किल्ल्यांचा विस्तृत इतिहास श्री सतीश अक्कलकोट यांच्या " दुर्ग " पुस्तकात वाचावा.

कसे जावे ?

पुण्याहुन साता-याकडे जाताना साधारण ९६ कि.मी वर डावीकडे भुईंज गावात यावे. इथुन 6 कि.मी वर किंकली गाव आहे. गावात काळ्या पाषाणात बांधलेले भॅरवनाथाचे (महादेवाचे) प्राचीन मंदीर पहावे. मंदीरात अतिशय सुंदर कोरीव काम केले आहे. किंकली गावासाठी भुईंजहुन बस तसेच वडापची चांगली सोय आहे. येथुन ३ कि.मी वर बेलमाची गाव हे पायथ्याचे ठिकाण आहे. दोन्ही गडांच्या मधल्या खिंडीतुन चढायला सुरुवात करावी. डावीकडचा किल्ला चंदन तर उजवीकडचा वंदन आहे. खिंडीतुन दोन गडांच्या मधल्या भागात यायला अर्धातास पुरतो.

गडावर काय आहे ?

वंदनः- दगडी उंचसखल पाय-यांवरुन चढले कि पुर्वेकडील पहिला दरवाजा लागतो. या दरवाज्याच्या दुस-या बाजुला सुंदर गणपती मूर्ती कोरलेली आहे व नक्षीकाम केले आहे. इथुन पुढे वळणांची वाट चालून गेले की फारसी शिलालेख कोरलेला दुसरा दरवाजा येतो. आतील बाजूस पहारेक-यांसाठी बांधलेल्या खोल्या आहेत. इथे सफाई केली कि ८-१० माणसे आरामात राहु शकतात, फक्त छोटी वटवाघुळे भरपुर आहेत त्यामुळे त्यांचा वास सहन करावा लागेल. पुढे काही पाय-या चढल्यावर किल्ल्याचा माथा येतो. वरती पडलेली काही घरे आणि चौथरे आहेत. सरकारवाड्यात १०-१५ जण आरामात राहु शकतात. सरकारवाड्याशेजारी एक उत्तम स्थितीतील मशीद आहे. आजुबाजुला काही कबरी आहेत. जवळ्च पाण्याचे दोन उत्तम साठे आहेत, पण पाणी चांगले नाही. वर अजुन एक १०० फूट उंचीची टेकडी आहे जिच्या माथ्यावर एका वाड्याचे अवशेष आहेत. भोवताली आवश्यक तिथे तटबंदी आणि बुरूज बांधले आहेत. गडावरून अजिंक्यतारा, वॅराटगड, कमळगड, मांढरदेवी हे गड दिसतात.

रानफुले

प्रमोद, प्रशांत, चैतन्य, निरंजन

---------------------------------------------------

This page is maintained by Chaitanya Rajarshi for sahyadri Explorers

तलाव, दरवाजा, सरकारवाड़ा, फारसी शिलालेख

चंदन:- वंदन फिरून झाल्यावर पुन्हा मधल्या खिंडीत यावे, इथुन चंदन साधारण १ कि.मी लांब आहे. डोंगराला पूर्ण वळसा घालावा लागतो व ही वाट थोडी बिकट आहे. प्रवेशद्वारापाशी दोन पडके बुरुज आहेत. पाय-या चढल्या की माथ्यावर पडकी इमारत आहे. एक प्रंचड वटवृक्ष आहे जो पाच वडांचा बनलेला आहे, त्यामुळे याला "पाचवड" म्हणतात. महादेवाच्या देवळात दोन पिंडी आहेत, ज्या पाचलिंगी आहेत. येथे श्रावणात मोठी जत्रा भरते. पुढे अपूर्ण अवस्थेतील एका इमारतीचे दोन दगडी खांब आहेत. प्रत्येक खांब चार चार भल्या थोरल्या दगडांचा आहे. पूर्वी तटावर मोठे मोठे धोंडे कसे चढवीत, याची थोडी कल्पना या खांबावरुन येते. पहिला दगड तळांत रचल्यावर शेजारी तेवढाच मातीचा भराव घालून त्यावरुन दुसरा दगड लोटीत, असे हे चारी दगड चढविलेले आहेत. किल्ल्यात एक फुटलेले तळे आणि काही इमारतींचे अवशेष आहेत. वंदनसारखीच इथे एक मशीद आहे. उत्तरेकडे चांगल्या अवस्थेतील बुरुज आहे, एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे आणि दक्षिणेकडे छ्प्पर नसलेले तीन खोल्यांचे दारुगोळा कोठार आहे. कोठाराला तळघर असून, उतरायला पाय-या आहेत पण आत बरीच झुडुपे वाढल्यामुळे कोणी जात नाही.

महत्त्वाचे:- जेवणाची सोय आपली आपणच करावी, पाणी फक्त पावसाळ्यात मिळेल, रहायची सोय वर लिहील्याप्रमाणे आहे. दोन्ही गड फिरायला २-२ तास पुरतात, त्यामुळे एका दिवसात हे गड बघुन होतात.

आभारः हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय गो. नी. दाडेंकरांच्या 'किल्ले' (मॅजेस्टिक प्रकाशन) आणि श्री सतीश अक्कलकोट यांच्या ' दुर्ग' (सह्याद्री भ्रमण मंडळ प्रकाशन) पुस्तकांची मोलाची मदत झाली. ही पुस्तके संग्राह्य आहेत व ती जरुर वाचावीत.

आपण करण्यासारखे काही :-

    1. डोंगरावर व माथ्यावर झाडी खुपच विरळ आहे, त्यामुळे जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील व काही वर्षात झाडी वाढेल. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.

    2. पाण्याचे तळे स्वच्छ केले तर बारामाही पाण्याची सोय होईल.

    3. प्लास्टिक किंवा अन्य कचरा करु नये. कचरा सोबत न्यावा व कचराकुंडीतच टाकावा.

    4. गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुन सुद्धाही आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे लिहीलेले आढळल्यास फोटो काढून आम्हास पाठविणे.

    5. गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांनाही परावृत्त करावे.